ब्लॉग संग्रहण

शनिवार, २५ जुलै, २०१५

कधी कधी ...

कधी कधी अवचित ढग दाटून येतात
बघता बघता मोकाट कोसळू लागतात
भिजून जाते सारी सृष्टी चिंबचिंब अन
निग्रही मनाचे बांधही ढासळू लागतात !
तुझी वाट पहाताना तो ही सोबतीला
असायचा मला नेहमी भिजवायला
आता तू दूर गेल्यावर पण असतो
डोळ्यातील वहाते अश्रू लपवायला !
जगाला मी नेहमीच कठोर दिसायची
आतली मी फक्त त्याला कळायची
त्याच्या कुशीतच बोचऱ्या वेदनांतून
मोकळी होण्याची संधी मिळायची !
आजही आलाय नेहमीसारखा धावून
मी ही कोसळेन अशी शंका घेऊन
पण मी अगदी निश्चल उभी आहे
स्वताच्याच आधारावर पाय रोवून !
कारण
आताशी पाऊस रुळायला लागलाय
अन
त्याचा मूड मला कळायला लागलाय
अंबिका टाकळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा